येस न्युज मराठी नेटवर्क : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील काही भागात तुफान पाऊस झाला. या पावसानं होत्याचं नव्हतं करुन टाकलं आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. काही ठिकाणी पिकं सडली आहेत तर सोयाबीन जागेवरच उगवत असल्याचं देखील समोर आलं आहे. या नुकसानीमुळं शेतकरी हवालदिल झाला असून सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात 476 कोटी सात लाख 75 हजारांचे नुकसान
विभागीय आयुक्त कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे 476 कोटी सात लाख 75 हजारांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आजपर्यंत 25 लाख 98 हजार 213 हेक्टरचे नुकसान झाले आहे तर बाधित शेतकऱ्यांची संख्या 35 लाख 64 हजार 391 इतकी आहे. 90 टक्के पंचनामे झाल्याचा दावा विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आला आहे.