सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून सोलापुरातून सुटणाऱ्या हुतात्मा एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, कोल्हापूर एक्सप्रेस आणि पुणे पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नोकरदार वर्ग आणि व्यापारी, सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे, त्यामुळे वरील सर्व गाड्यांची सेवा सोलापुरातून पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी डिव्हीजनल रेल्वे मॅनेजर शैलेश गुप्ता यांची भेट घेऊन केली.
गेल्याच आठवड्यात आमदार देशमुख यांनी दिल्ली येथे रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन सोलापूर जिल्ह्यातील रेल्वेच्या कामांबाबत चर्चा करून विविध मागण्या केल्या होत्या. त्यानंतर बुधवारी आमदार देशमुख यांनी शैलेश गुप्ता यांची डीआरएम ऑफीस येथे भेट घेतली. यावेळी आमदार देशमुख म्हणाले, सोलापुरातून प्रमुख रेल्वे सेवा बंद असल्याने अनेकांचे हाल होत आहेत. एसटी, ट्रॅव्हल्स, खासगी गाड्यांनी लोकांना प्रवास करत करावा लागत आहे. यामुळे त्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे. त्यामुळे सोलापुरातून रेल्वे सेवा पूर्ववत करावी, याबरोबरच ‘वंदे भारत’ रेल्वेला सोलापुरात थांबा द्यावा, रेल्वेविभागाकडील रिकाम्या जागेवर वृक्षारोपण करावे, रेल्वेच्या अनेक मीटरगेच्या जागा पडून आहेत, तेथे रेल्वेने डेव्हलपमेंट करावी, सोलापूर ते टिकेकरवाडी या लोहमार्ग दरम्यान आसर चौक येथील रेल्वे ओव्हरब्रिजचे रुंदीकरण व नूतनीकरण करावे, सोलापूर रेल्वे स्थानक येथे सौर ऊर्जा प्रकल्प बसवावा, होटगी स्टेशन स्थानकावरील ब्रिटीशकालीन पूल वाहतूकीस खुला करावा, ग्रामीण भागातील लोकांना आरक्षण तिकिट काढण्यासाठी शहरात यावे लागते. त्यांची सोय करण्यासाठी होटगी स्टेशन स्थानकावर तिकीट आरक्षण कार्यालय चालू सुरू करावे, होटगी स्टेशन येथे रेल्वेच्या खुल्या जागेत बांबू लागवड करण्यासाठी परवानगी मिळावी, पाकणी (ता. उत्तर सोलापूर) येथील रेल्वे पूल खालून भुयारी मार्ग करून मिळावा यासह विविध मागण्या आ. देशमुख यांनी यावेळी केल्या. यावेळी डिव्हिजनल मॅनेजर गुप्ता यांनी यांनी वरील सर्व मागण्यांबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.