येस न्युज मराठी नेटवर्क : आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला धोनीच्या चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागला. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या मुंबईला या मॅचमध्ये कर्णधार केरॉन पोलार्ड विजय मिळवून देऊ शकला नाही. आता आज कोलकात्याविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजयाची चव चाखण्यासाठी मुंबई इंडियन्स आतुर झालेला आहे. बुधवारी दिल्लीने हैदराबादवर विजय मिळवून गुणतालिकेत प्रथमक क्रमांकावर झेप घेतलीय. त्यामुळे मुंबईला जर टॉप 4 मध्ये टिकून राहायचं असेल तर आज होणाऱ्या सामन्यात कोलकात्याला आस्मान दाखवावंच लागेल.
इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि अष्टपैलू आंद्रे रसेलने आरसीबीविरुद्ध चमकदार गोलंदाजी केली आणि शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यरच्या चमकदार खेळीमुळे 10 ओव्हर बाकी असताना लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग केला. केकेआरने या सामन्यात त्यांची आक्रमक मनोवृत्ती दाखवली आणि त्याच आक्रमतकेने मुंबईविरुद्ध ते पुन्हा एकदा मैदानात उतरतील.