मुंबई : कोरोनाची रुग्णसंख्या राज्यात कमी होत असताना दुसरीकडे तिसऱ्या लाटेचा धोकाही तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधत्मक नियमांचं पालन केले पाहिजे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिसरी लाट किती काळ राहील, किती लांबेल आपल्याच हातात आहे. नियंमांचे पालन करायला पाहिजे, असं वक्तव्य राजेश टोपे यांनी केलं आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे आज लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या टीबी जागरुकता आणि निर्मुलन पंधरवडा कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते. कोविडची तिसरी लाट राज्यात अद्याप आलेली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात टेस्टिंग सुरु आहे आणि पॉझिटिव्हीटी रेट देखील कमी असल्याचं ते म्हणालेत. दुसरीकडे जगात मात्र तिसरी लाट आलेली आहे, मात्र ती सौम्य आहे आणि मृत्यूचे प्रमाण देखील कमी असल्याचं राजेश टोपे म्हणाले.