मुंबई : दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईसंदर्भात पूर्ण माहिती अद्याप हाती आलेली नाही. पोलिसांना त्यांच्या पद्धतीनं काम करु दिलं पाहिजे. पोलीस यंत्रणेत कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही. महाराष्ट्र पोलीस कसून या प्रकरणाचा तपास करत आहेत, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिली आहे.
दिलीप वळसे पाटील बोलताना म्हणाले की, “देशात विविध ठिकाणी घातपाताच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरुन काही संशयित व्यक्तींना दिल्ली पोलिसांनी अट केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील एका व्यक्तीचा समावेश आहे. यासर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या घटनेबाबत त्यांनी मला सर्व माहिती दिली आहे. अजून याप्रकरणाची सर्व माहिती मिळण्यासाठी वेळ लागणार आहे. हे प्रकरण नाजूक आहे. हा राजकारणाचा विषय नाही. पण तरि या संदर्भात सर्व वस्तुस्थिती सर्व जनतेला माहिती हवी, त्यासाठी महाराष्ट्र एटीएस प्रमुख विनित अग्रवाल त्यांच्या कार्यालयात दुपारी 3 वाजता माध्यमांशी संवाद साधून अधिक माहिती देतील.”