कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली. हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने 127 कोटींचा घोटाळा केला असून, त्याबाबत 2700 पानांचा पुरावा इन्कम टॅक्सला दिल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. सोमय्यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यावर घोटाळ्याचे आरोप केले.
किरीट सोमय्यांनी माझ्या पक्षाविरुद्ध, पवारसाहेबांविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले आहेत. सोमय्यांनी माझ्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. किरीट सोमय्यांच्या CA पदवीबद्दलच शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती IOC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर ती खोटी असती तर त्याचवेळी समोर आलं असतं. आम्ही निवडणूक आयोगालाही कागदपत्र दिली आहेत. आपण नवं काय करतोय असा राणाभीमदेवी थाटात आरोप सोमय्यांनी केला. माझ्यावर इन्कम टॅक्सने धाड टाकली त्यात काहीच मिळालं नाही. अडीच वर्ष झाली धाड टाकून, त्यावर काही कारवाई नाही. आता किरीट सोमय्या उठून आरोप करत आहेत.