सोलापूर : गेल्या दोन वर्षापासून कोरोनाने संपूर्ण परिस्थितीच बदलून टाकली आहे .सामान्य नागरिकांना तर जगणे मुश्कील बनले आहे .हाताला काम नसल्यामुळे अनेकांच्या चुली पेटणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत जीवाचे बरे वाईट करण्याची मानसिकता वाढू लागली आहे. रविवारी मात्र एक कुटुंब नगरसेविका फिरदोस पटेल यांच्यामुळे बचावले. विजापूर रस्त्यावरील धर्मवीर संभाजी तलावात आपल्या दोन मुलांसह आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या एका महिलेला नागरिक,पोलीस तसेच नगरसेविका फिरदोस पटेल यांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. या महिलेचे मनपरिवर्तन करून नगरसेविका फिरदोस पटेल यांनी कठीण परिस्थितीतसुद्धा जगण्याचा मूलमंत्र देत त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले.
निलोफर महिबूब शेख ( वय ३५ )हि महिला सिमरन महिबूब शेख ( वय ११ )आणि मुलगी, रेहान महिबूब शेख (वय ८) हा मुलगा यांना सोबत घेऊन संभाजी तलावाजवळ आत्महत्या करण्यासाठी आलेली होती.काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांना समजताच त्यांनी त्या महिलेला तलावापासून बाजूला घेत पोलिसांना बोलावून त्यांची व्यथा जाणून घेतली.त्यांनतर त्यांनी तिला व मुलांना आपल्या गाडीतून घरी नेले.अडचण जाणून घेऊन त्यांना एक महिन्याचे जीवनावश्यक साहित्य भरून देत तिचे घरभाडे देऊन जगण्याचा आधार दिला.शिवाय तिच्या एक मुलगा व एका मुलीचा शिक्षणाचा खर्च स्वतः नगरसेविका पटेल यांनी उचलला. नगरसेविका पटेल यांच्या सतर्कतेमुळे आपले कुटुंब आत्महत्येपासून परावृत्त झाल्याची भावना निलोफर यांनी व्यक्त केली.तर कोणीही असे पाऊल उचलू नये असे आवाहन नगरसेविका पटेल यांनी केले.