येस न्युज मराठी नेटवर्क : ओव्हलच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 157 धावांनी धुव्वा उडवला आहे. या सामन्यात सर्वप्रथम इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारताचा पहिला डाव अवघ्या 191 धावांवर संपवला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावांपर्यंत मजल मारत 99 धावांची आघाडी मिळवली होती. ही आघाडी फोडत भारताने दुसऱ्या डावात 466 धावांचा डोंगर उभा केला आणि इंग्लंडला 368 धावांचं आव्हान दिलं. भारताने दिलेलं हे आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांना पेलवलं नाही. इंग्लंडचा संघ 210 धावांमध्ये गारद झाला. त्यामुळे भारताने या सामन्यात इंग्लंडवर 157 धावांनी मात करत मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवली आहे.
इंग्लंड संघाला उतरती कळा
इंग्लंडकडून दुसऱ्या डावात भारताच्या 368 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात करण्यात आली. सलामीवीर रॉरी बर्न्स आणि हासिब हमीद यांनी शतकी भागिदारी केली. पण रॉरीचं अर्धशतक होताच 100 धावांवर इंग्लंडची पहिली विकेट पडली. त्यानंतर हासिबने डाव सांभाळायचा प्रयत्न केला. पण 62 व्या ओव्हरमध्ये जाडेजाने हासिबला बाद करत दोन्ही सेट फलंदाज तंबूत धाडले. त्यानंतर एक एक करुन इंग्लंडचे खेळाडू तंबूत परतू लागले. आतापर्यंत सहा इंग्लंडवासी तंबूत परतले असून जाडेजा आणि बुमराहने 2-2 तर शार्दूलने एक विकेट घेतला आहे. एक खेळाडू धावचीत झाला आहे.
गोलंदाजांचा टिच्चून मारा
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. त्यामुळे इंग्लंडचा डाव 210 धावांवर रोखण्यात टीम इंडियाला यश मिळालं. या डावात भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजाने प्रतेयकी 2 विकेट घेतल्या. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावातही चांगली कामगिरी केली होती. पहिल्या डावातही उमेश यादवने 3, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजाने प्रत्येकी दोन, तर शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराने प्रत्येकी एक विकेट घेतली होती.