टोकियो : टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताचा धमाका सुरुच आहे. भारताचा अॅथलिट प्रवीण कुमारने रौप्य पदक जिंकलं आहे. प्रवीण कुमारने पुरुषांच्या T44 उंच ऊडी स्पर्धेत हा पराक्रम केला. उंच उडीत भारताला मिळालेलं हे तिसरं पदक आहे. यापूर्वी निषाद कुमार आणि मरियप्पन यांनी भारतासाठी रौप्य पदकं जिंकली होती. आता प्रवीण कुमारच्या पदकासह भारताच्या ताफ्यात 11 वं पदक जमा झालं आहे. यामध्ये 6 रौप्य पदकांचा समावेश आहे.
प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडी टी 64 स्पर्धेत 2.07 मीटरची नोंद केली. हा आशियाई विक्रम ठरला आहे. ब्रिटनच्या जोनाथन ब्रूम-एडवर्ड्सने 2.10 मीटरसह सुवर्ण, तर पोलंडच्या मॅसिज लेपियाटोने 2.04 मीटरसह कांस्य पदक जिंकले. पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या पदकांची संख्या आता 11 झाली आहे. भारताच्या खात्यात दोन सुवर्ण, सहा रौप्य आणि तीन कांस्य पदकं झाली आहेत. पॅरालिम्पिकच्या एका वर्षातील ही भारताची सर्वोत्तम संख्या आहे. भारताने रिओ 2016 आणि 1984 च्या पॅरालिम्पिकमध्ये प्रत्येकी चार पदके जिंकली होती.