संदर्भ ग्रंथांसाठी संशोधकांना उपयुक्त: कुलगुरू
सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ग्रंथालयात नव्याने साकारण्यात आलेल्या स्वतंत्र नियतकालिक विभागाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले.
कोविड विषाणूच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. महेश माने, प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदम, वित्त व लेखाधिकारी श्रेणीक शहा, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणापूर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. वसंत कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रंथालय विभागाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. या नव्या विभागात 89 भारतीय, 20 आंतरराष्ट्रीय असे एकूण 109 नियतकालिके उपलब्ध असल्याचे डॉ. कांबळे यांनी यावेळी सांगितले.
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या की, विद्यापीठातील ग्रंथालयामध्ये स्वतंत्र नियतकालिके विभागाची कमतरता होती, त्यामुळे त्यासाठी योजना आखून सुसज्ज असे नवे दालन व त्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांची सोय उपलब्ध करून दिली आहे. संदर्भ ग्रंथांसाठी विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांना देखील संशोधन करताना नियतकालिके विभाग अतिशय उपयुक्त ठरणार आहे. ग्रंथालय समृद्ध होण्यासाठी या विभागाचा वाटा असणार आहे. व्यापक दृष्टिकोनातून अभ्यास व ग्रंथांचे वापर झाले तरच संशोधनाची गुणवत्ता वाढणार आहे आणि हीच बाब नवीन शैक्षणिक धोरणात असल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली यांनी केले तर आभार वरिष्ठ ग्रंथालय सहायक डॉ. पल्लवी सावंत यांनी मानले.