मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राणे-शिवसेना वादाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या सुरक्षेत ही वाढ करण्यात आल्याच म्हटले जात आहे. संजय राऊत यांच्या घर आणि सामनाच्या कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले आहे. त्याचसोबत, डीसीपी प्रशांत कदम संजय राऊत यांच्या भेटीला गेल्याची देखील माहिती समोर येत आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आणि राणे-सेना वादानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
संजय राऊत यांच्याकडे सध्या वाय दर्जाची सुरक्षा आहे. राऊत यांच्या या ताफ्यात सध्या ६ शस्त्रधारी SPU जवानांचा ताफा आहे. मात्र, आता त्यांच्या ताफ्यात २ अतिरिक्त SPU चे जवान देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. काहीच दिवसांपूर्वी भाजपा नेते नितेश राणे आणि निलेश राणे यांनी संजय राऊत यांना एक इशारा दिला होता. संजय राऊत जिथे दिसतील तिथे करेक्ट कार्यक्रम करू, असा या दोघांनीही सांगितले होते . त्यानंतरच आता राऊत यांच्या सुरक्षेत ही वाढ करण्यात आल्याचे दिसून येत आहे.राऊत यांच्या सुरक्षेत १२ पोलीस जवानांसहीत साध्या वर्दीतील पोलिसांचा समावेशही करण्यात आला आहे.
राऊत-राणे संघर्ष टोकाला
शिवसेना-राणे वाद हा काही महाराष्ट्राला नवा नाही. अवघ्या काहीच दिवसांपूर्वी राज्यात हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला. केंद्रीय मंत्री नारायण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या खळबळजनक वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले. भाजपा-सेना पुन्हा एकदा आमने-सामने आले. या सगळ्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये देखील मोठ्या शाब्दिक चकमकी झडल्या. याच दरम्यान, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून राणेंवर घणाघाती टीका झाली. त्यामुळे संजय राऊत आणि राणे वाद पेटण्यास सुरुवात झाली. राणेंचे दोन्ही पुत्र निलेश आणि नितेश राणे यांनी या वादात उडी घेतली होती. यावेळी अत्यंत टोकाच्या टीका पाहायला मिळाल्या. याच पार्श्वभूमीवर राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
धोका अंतर्गत शत्रूंपासून – आशिष शेलार
संजय राऊत यांना पक्षांतर्गत धोका वाढला असेल. कारण पुढेपुढे तेच दिसत आहेत आणि त्यामुळे शिवसेना पक्षाचं नेतृत्व करताना ते दिसत आहेत. ते संपादक आणि माझे मित्र असल्याने मला भीती आहे. सुरक्षा वाढवताना सरकारी यंत्रणांनी धोका कोणापासून आहे हे पाहावे. आमचे म्हणणे आहे की धोका हा अंतर्गत शत्रूंपासून आहे, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.