बार्शी:येथील डी.लीट पुरस्कार विजेते डॉ.नवनाथ कसपटे यांनी दि.29 ऑगस्ट रोजी गोरमाळे येथे शेतकऱ्यांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.यावेळी डॉ.कसपटे यांनी बांधावरील दुर्लक्षित समजल्या जाणाऱ्या सिताफळावर प्रयोग व संशोधन झाल्याने गुणवत्तापूर्ण उत्पादनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा मार्ग सापडला असल्याचे सांगितले.तसेच सिताफळाच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने निर्मिती केल्यानंतर काही पैसा व्यापाऱ्यांना मिळाला तरी मोठे मन ठेवयाला शिकले पाहिजे.शेतकऱ्यांनी इतरांचे प्रयोग पाहून त्यांनीही ते आत्मसात करायला पाहिजे.सिताफळाला त्याच्या गुणधर्माप्रमाणे बहरु द्या, निसर्गाप्रमाणे त्याला जगू द्या, जास्तीच्या खतांचा व औषधांचा अनावश्यक वापर टाळा असे प्रतिपादन संशोधक डॉ.नवनाथ कसपटे यांनी केले.
या शिबीरात राज्यातील कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. यावेळी अमोल व्हनकळस,रोटरीचे अध्यक्ष विक्रम सावळे,प्रवीण कसपटे,रवींद्र कसपटे उपस्थित हाेते.
पुढे डॉ.कसपटे म्हणाले की, सिताफळास उन्हाळ्यात पाण्याची आवश्यकता नसते त्यामुळे पाण्याचा प्रश्न येत नाही.त्यात गोरमाळे गावात उन्हाळ्यात पिण्याचे पाणी बार्शीतून आणावे लागत असल्याने गोरमाळे हे दुष्काळी पट्ट्यातील गाव आहे. परंतु वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सिताफळाची चांगल्या दर्जाची उत्पादने शक्य झाली.दहा एकर क्षेत्रासाठी एक एकर शेततळे उपलब्ध असल्यास तेवढे पाणी पुरेसे होईल.शेतीमध्ये आपण स्वत: प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते,पूर्वी द्राक्ष बागा होत्या त्या बंद करून सिताफळात चांगले उत्पन्न घेतले.झाडांना चुना मोरचुदची पेस्ट लावणे,काड्या कमी करणे,छाटणी कशी करायची,फळांना मार लागू नये यासाठी काय करावे,फळांची मर्यादित संख्या,फळ गळती,करपा,डाग,फुलगळ,माती परीक्षण,पान देठ पृथकरण,प्रक्रिया उद्योगांत रबडी,बासुंदी,आईस्क्रीम इत्यादींसाठीचा उपयोग याबाबतही कसपटे यांनी सविस्तर माहिती सांगीतली.
यावेळी अमोल व्हनकळस म्हणाले की, पारंपरिक शेतीत निसर्गाचीही साथ गरजेची असते.एनएमके वाणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात तेजोमय दिवा उपलब्ध झाला आहे.आपले यश ग्रामीण भागात पोहोचविण्याचा कसपटे यांचा प्रमाणिक प्रयत्न आहे.आपल्या कृषिप्रधान देशात शेतकरी हा पाठीचा कणा आहे.त्यात वजन,पोषण, किंमत,आकार,नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यासही करणे गरजेचे आहे.
यावेळी रवींद्र कसपटे यांनी कीड रोग व्यवस्थपन विषयक सविस्तर माहिती सांगीतली.विक्रम सावळे यांनीही डॉ.नवनाथ कसपटे यांनी केलेल्या संघर्षाचे विवेचन करुन,त्यांच्या कष्टामुळे देशातील लाखो शेतरी समृद्ध झाल्याची उदाहरणे दिली.सोबतच मार्गदर्शन आणि नाविण्याच्या शोधासाठी ते जगाच्या कानाकोपऱ्यात सतत भेटी देवून ते अनेक शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन करत असल्याचेही त्यांनी सांगीतले.