पुणे : मागील काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरली असली तरी अद्याप काही शहरात कोरोना विषाणूची स्थिती नियंत्रणात नाहीये. पुण्यातही कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात जमावबंदीचा निर्णय लागू केला आहे. असे असतानाही शिवसेनेच्या एका नेत्याने आपल्या मुलाच्या लग्नात जवळपास 2000 लोकांना आमंत्रित करून कोरोना नियमांचा फज्जा उडवला आहे. संबंधित लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना नेत्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला .
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी आपल्या मुलाचे लग्न शाही थाटात केले आहे. या लग्नात त्यांनी अनेक आजी-माजी नेत्यांसह सदस्यांना आमंत्रित करत कोरोना नियम पायदळी तुडवले . लांडे यांच्या मुलाच्या लग्नाला जवळपास 1800 ते 2000 लोकांची गर्दी जमवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जुन्नर पोलिसांनी देवराम लांडे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील शिवनेरीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या बारव येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात दोन दिवसाचा एक शाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे. या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा शाही विवाहसोहळा चर्चेत आला आहे. या विवाहसोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांसोबत आजी-माजी सदस्यांनी उपस्थिती दर्शवली होती. देवराम लांडे यांच्या पुत्राच्या लग्नात कोरोना नियमाचं उल्लंघन झाल्याची फिर्याद पोलीस अंमलदार अमोल अशोक शिंदे यांनी दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जुन्नर पोलिसांनी बारव येथील महालक्ष्मी कार्यालयाचे मालक केदारी आणि देवराम लांडे यांच्यासह अन्य चार नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.