सोलापूर : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी धवलसिंह मोहिते-पाटील यांची गुरुवारी रात्री उशिरा निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे नाना पटोले यांनी स्वीकारल्यानंतर संपूर्ण राज्याची कार्यकारणी बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यात सोलापूर मधील कार्यकारणी बदलण्याची चर्चा सुरू झाली होती. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह सुरेश हसापुरे, तुंगतचे प्रकाश पाटील यांच्या नावाची चर्चा होती. यामध्ये धवलसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली आहे. मध्यंतरी माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निवास्थानी धवलसिंह मोहिते-पाटील यांचे नाव फायनल झाले होते.
आगामी काळात सोलापूर जिल्ह्यात नगरपालिका, ग्रामपंचायत आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर युवा नेता म्हणून धवलसिंह मोहिते-पाटील यांची निवड करण्यात आली आहे. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. जनसेवा संघटनेच्या माध्यमातून धवलसिंह मोहिते पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यात युवकांचे चांगले संघटन केले आहे त्याचा फायदा धवलसिंह यांना आता होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.