अहमदनगर – गावातील जत्रा व तमाशा कलेला परवानगी द्यावी, अशी मागणी कलावंत रघुवीर खेडकर यांनी केली आहे. सध्या कोरोना संकटामुळे अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता दुसरी लाट हळूहळू ओसरत असून शासनाने देखील सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र, गावातील जत्रा, तमाशा कला यांना परवानगी देण्यात आली नाही.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांनी कलावंताच्या प्रश्नांवर लक्ष घालण्याची मागणी आता लोक कलावंतांकडून केली जात आहे. राज्यातील बाजारपेठा, सार्वजनिक व्यवस्था चालू झाली आहे. त्यातच पद्धतीने गावजत्रा व तमाशा चालू करावेत व आमच्या गोरगरीब कलावंताकडे लक्ष द्यावे जेणेकरून आम्हाला सर्व गरजांसाठीची मागणी सरकारकडे करावी लागते ती मागणी थांबेल व पोट भरणाऱ्या कलावंतांना हक्काचा रोजगार पुन्हा भेटेल, असे मत तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केले आहे. राज्यातील जत्रा उत्सव सुरू करावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.