नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहित क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. आशिष देशमुख यांच्या या लेटरबॉम्बने एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता काँग्रेस पक्षातील हा अंतर्गत वाद दिल्ली दरबारी पोहोचला आहे.
आशिष देशमुखांच्या आरोपानंतर क्रीडामंत्री सुनील केदार दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत पक्षश्रेष्ठींची सुनील केदार भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. आशिष देशमुखांनी केलेल्या गंभीर आरोपावर सुनील केदार हे पक्षश्रेष्ठींसमोर आपली बाजू मांडणार असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात देशमुख यांनी सुनील केदार यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. सुनील केदार यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत भ्रष्टाचार केल्याचे देशमुखांनी म्हटले आहे.
2002 मध्ये सुनील केदार हे नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी बँकेचे 150 कोटी रुपये खासगी दलालांमार्फत रोख्यांमध्ये गुंतवली आणि पूर्ण रक्कम गमवावी लागली. या दलाल कंपन्या सुनील केदार यांनी संगमनताने ही रक्कम सरकारी रोखे विकत घेण्यासाठी परस्पर दिली होती. या दलालांनी त्या संपूर्ण रक्कमेचा अपहार करुन बँकेला ना रोखे दिले ना पैसे परत दिले. यामुळे नागपूर जिल्हा बँकेचे 150 कोटींचे नुकसान झाले, असा आरोपही देशमुख यांनी केला आहे.