नवी दिल्ली : भारताने मंगळवारी ७८ लोकांना मायदेशी आणले असून त्यात २५ भारतीय व इतर अफगाणी शीख लोकांचा समावेश आहे. त्यांना दुशान्बे येथून आणण्यात आले. त्यांना काबूल येथून ताजिकिस्तानातील या शहरात आणण्यात आले होते. गुरु नानक साहिबचे तीन ग्रंथ असलेल्या गटाला दुशान्बे येथून लष्करी विमानाने देशात आणण्यात आले, असे भारतीय हवाई दलाने म्हटले होते.
मंगळवारी पुन्हा या मोहिमेत मायदेशी आणण्यात आलेल्या लोकांमुळे १६ ऑगस्टपासून सुटका करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या आता आठशेवर गेली आहे. तालिबानने काबूलवर कब्जा केल्यानंतर १६ ऑगस्टला पहिल्यांदा लोकांच्या पहिल्या गटाची सुटका करण्यात आली होती. आज ज्यांना भारतात आणण्यात आले त्यांचे इंदिरा गांधी विमानतळावर केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी व व्ही मुरलीधन यांनी स्वागत केले. एअर इंडियाच्या विमानाने या लोकांना दुशान्बे येथून आणण्यात आले. या लोकांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांच्याकडे गुरु ग्रंथसाहिबच्या तीन प्रती होत्या त्याही सुरक्षित आणण्यात आल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, ७८ जणांना एअर इंडियाच्या विमानाने भारतात आणण्यात आले. त्यात २५ भारतीय नागरिक आहेत. सोमवारी १४६ जणांना चार विमानांनी भारतात आणण्यात आले होते ते त्यांना आधी कतारची राजधानी दोहा येथे आणण्यात आले होते. नाटो व अमेरिकी विमानांनी त्यांची सुटका केली होती.