सोलापूर : येथील जुने विडी घरकुल एच ग्रुप परिसरातील युनियन बॅंकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा ते शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रसंग घडला. या प्रकरणी राजेश रामकृष्ण बालिंगल (रा. अशोक चौक, दक्षिण सदर बझार) यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने बॅंकेचे एटीएम फोडण्याच्या हेतूने मशिनची तोडफोड केली. त्यात दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. पोलिस उपनिरीक्षक सचिन माळी हे पुढील तपास करीत आहेत.
चोरट्याने जुने विडी घरकुल परिसरातील मुख्य चौकातील एटीएम फोडण्याचे धाडस केले. तत्पूर्वी, त्याने तेथील परिस्थितीचा आढावा घेतला असल्याचा पोलिसांना संशय आहे. एटीएम फोडण्याचा प्रयत्न करताना अडथळा येणार नाही, याचाही चोरट्याने अचूक अंदाज घेतला होता. एटीएममध्ये गेल्यानंतर त्याने सर्वप्रथम सीसीटिव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली. त्यामुळे पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागला नाही. एटीएम फोडून त्यातून पैसे काढता येत नसल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने तिथून पलायन केल्याचाही पोलिसांना संशय आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारावर पोलिसांनी वॉच ठेवला असून तो नेमका चोरटा कोण, याचा शोध सुरू आहे. चोरट्यांनी आता एटीएम सेंटरवर लक्ष केंद्रित केल्याचे चित्र असून, काही दिवसांपूर्वी होटगी रोडवरील “एसबीआय’च्या एटीएममध्ये आलेल्या एका शिक्षकाला फसविल्याची घटना घडली होती. त्यामुळे बॅंकांनी एटीएम केंद्रांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
एटीएम केंद्रावर सुरक्षारक्षक नव्हता
जुने विडी घरकुल परिसरातील मुख्य चौकातील एटीएम फोडण्याचा चोरट्याने प्रयत्न केला. मशिनमधून पैसे काढण्यासाठी त्याने किमान काही तास प्रयत्न केले असतील, असा पोलिसांना संशय आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा ते शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली आहे. युनियन बॅंकेच्या त्या एटीएमबाहेर बॅंकेचा सुरक्षारक्षक नसल्याने चोरट्याने तेवढे धाडस केले, असे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सचिन माळी यांनी सांगितले.