करमाळा : लव्हे येथील गुरुवर्य स्वामी आनंदयोगी महाराज (वय 70) यांचे सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास निधन झाले आहे. सकाळी त्यांची तब्येत बरी नसल्याचे समजताच शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील हे स्वत: त्यांना घेऊन करमाळा येथे उपचारासाठी आले होते. मात्र, त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होत असतानाच त्यांचे देहावसान झाले. या वेळी त्यांच्यासमवेत असलेले माजी आमदार नारायण पाटील यांना गहीवरून आले.
लव्हे येथे स्वामी आनंद योगी महाराज यांच्यासाठी मॉं शारदा आश्रम नावाचा आश्रम उभारण्यात आला होता. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. माजी आमदार नारायण पाटील यांचे ते गुरू होते. त्यांच्या दर्शनासाठी वेगवेळ्या ठिकाणावरून सामाजिक, राजकीय, शासकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेकजण येत असत. आनंदयोगी महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात होती. गुरुवर्य स्वामी आनंदयोगी महाराज हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. सोमवारी नारायण पाटील यांना माहिती समजताच त्यांनी उपचार करण्यासाठी आनंदयोगी महाराज यांना स्वतःच्या गाडीत करमाळा येथे रुग्णालयात घेऊन आले होते. दरम्यान, त्यांचे निधन झाले. हे समजताच पाटील गहीवरले. गुरुवर्य स्वामी आनंदयोगी महाराज यांचा लव्हे येथे मॉं शारदा नावाचा आश्रम होता. येथे विविध धार्मिक कार्यक्रम होत होते. मॉं शारदा आश्रम लव्हे येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त झालेल्या अनेक कार्यक्रमांत माजी आमदार नारायण पाटील हजर असत. स्वामी आनंदयोगी महाराज यांच्या एका वाढदिवसानिमित्त साखरतुला करण्यात आली होती.