सोलापूर : सोलापूर विभागातील किसान रेल्वे सुविधेला एक वर्ष झाले असून मागील वर्षभरात केलेल्या वाहतुकीतून सोलापूर विभागाला ३५ कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. शेतकरी आणि व्यापारी यांचा शेती माल अन् फळभाज्यांना परराज्यात नेण्यासाठी लॉकडाऊन काळात किसान रेल्वे ही संकल्पना पुढे आली. त्यानुसार देशभरात या रेल्वेला मोठ्या प्रमाणावर चांगला प्रतिसाद मिळाला. सोलापुरातून द्राक्षे, डाळिंब आणि पालेभाज्या यांचा मोठ्या प्रमाणावर ओडिशा, बिहार, उत्तर भारत, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांना पुरवठा करण्यात आला. त्यातून शेतकरी आणि सामान्य व्यापारी यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. या वाहतुकीने रेल्वे विभागाला वर्षभरात तब्बल ३५ कोटींचा महसूल जमा करून दिला आहे. ही बाब सोलापूरच्या दृष्टीने प्रगती साधणारी आहे.
२१ ऑगस्ट २०२१ रोजी किसन रेल्वेची वर्षपूर्ती साजरा करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी सांगोला येथे वर्धापन दिन साजरा केला. या नव्या सुविधेबद्दल आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शंभराव्या फेरीसाठी हिरवा झेंडा दाखवून प्रोत्साहन दिले होते. त्याच या तीन रेल्वेने सोलापूर विभागाला लॉकडाऊन काळातही मोठा आर्थिक हातभार दिला आहे, अशी माहिती सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली.