पुणे : गेल्या काही दिवसांत बैलगाडा शर्यतीवरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातली आहे. मात्र, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांनी बैलगाडा शर्यत सुरु केल्या आहेत. त्या धर्तीवर महाराष्ट्रातही बैलगाडा शर्यत सुरु करावी अशी आक्रमक मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून होत आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील विविध भागात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही पोलिसांना गुंगारा देत गनिमी काव्यानं सांगलीच्या झरे गावात बैलगाडा शर्यत करुन दाखवली. या प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांबाबत आता गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.
बैलगाडा शर्यती दरम्यान जिथे गुन्हे दाखल झाले असतील ते गुन्हे मागे घेऊ आणि लोकांची यातून मुक्तता करण्याचा प्रयत्न करु, असं मोठं वक्तव्य दिलीप वळसे पाटील यांनी केलंय. गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या शेतकऱ्यांना आणि बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, असं असलं तरी वळसे-पाटील यांनी शेतकऱ्यांना अजून एक आवाहन केलं आहे. पुढे खटले दाखल होणार नाही म्हणून बैलगाडा शर्यत भरवू नका, असं वळसे पाटील म्हणाले. ते आज आंबेगाव तालुक्यातील मंचर उपजिल्हा रुग्णालयातील नव्या सुविधांच्या लोकार्पणावेळी बोलत होते.