सोलापूर : तरुणीला शिवीगाळ करत तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना नई जिंदगी परिसरात घडली. पीडित तरुणीने पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिस तरुणांचा शोध घेत आहेत. रिक्षाचे तीनशे रुपये भाडे दिले नाही म्हणून त्याने तरुणीला व तिच्या आईला शिवीगाळ केली. मनास लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केला, असेही फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक माळी हे पुढील तपास करीत आहेत.
गाडी लावण्यावरून मारहाण
गाडी लावण्यावरून शिवीगाळ करून दगडाने मारहाण केल्याची घटना मड्डी वस्ती, कुमठे परिसरात घडली. अमित दत्तात्रय मोरे यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली असून, अब्दुल सैफन शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मोरे यांनी घरासमोर लावलेली दुचाकी घेऊन जाताना शेख याने “तू नेहमी इथे गाडी का लावतो’ म्हणून शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर दगडाने डोक्यात मारून जखमी केले. त्यानंतर अमित व त्यांच्या आईला अंगावर गाडी घालून खल्लास करतो, अशी धमकी दिली, असेही फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.
शिक्षकाची 89 हजारांची फसवणूक
होटगी रोडवरील एसबीआय बॅंकेच्या एटीएम सेंटरवरून एका तरुणाने हैबत्ती अमसिद्ध वंजारे (रा. स्वामी विवेकानंद नगर) यांची 89 हजारांची फसणूक केली. वंजारे यांनी विजापूर नाका पोलिसांत धाव घेऊन त्या अनोळखी तरुणाविरुद्ध फिर्याद दिली. वंजारे हे व्यवसायाने शिक्षक आहेत. दरम्यान, एटीएममध्ये गेल्यानंतर पैसे काढताना पैसे निघाले नाहीत म्हणून वंजारे पैसे काढण्याचा प्रयत्न करीत होते. त्या वेळी त्यांच्या मागे उभारलेल्या व्यक्तीने एटीएममधून 15 हजार रुपये निघत नाहीत. तुमच्या मोबाईलवर ओटीपी आला का बघा, असे म्हणून एटीएम कार्डची अदलाबदली केली. त्यानंतर त्या व्यक्तीने वंजारे यांच्या एटीएमवरून 89 हजार रुपये काढले, असेही फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.
ध्यानधारणेसाठी गेल्यावर पळविला मोबाईल
घरात मोबाईल चार्जिंगला लावून देवपूजा करताना पत्नी हॉलचा दरवाजा पुढे करून ध्यानधारणा करायला दुसऱ्या खोलीत गेली. त्यावेळी चोरट्याने घरात प्रवेश करून चार्जिंगला लावलेला मोबाईल पळविला. या प्रकरणी सुधीर कमलाकर हंचाटे (रा. गोकूळ नगर, जुळे सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली. पोलिस नाईक जाधव हे पुढील तपास करीत आहेत.