मुंबई – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे तीन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची भेटीगाठी घेतल्या. या भेटीगाठी दरम्यान पक्षांतर्गत मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच दिल्लीतील पक्षश्रेष्ठीच ‘जी जबाबदारी आपल्यावर सोपवतील, ती जबाबदारी समर्थपणे पेलण्यासाठी आपण तयार आहोत’ असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले .
दिल्ली दौरा आटपून आल्यानंतर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आणि चंद्रकांत पाटील यांच्यासहित काही भारतीय जनता पक्षाचे नेते दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याबरोबर चंद्रकांत पाटील यांची बैठक झाली. मात्र गृहमंत्री अमित शहा आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली नाही. चंद्रकांत पाटील यांनी मुंबई राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे अमित शहा हे चंद्रकांत पाटील यांच्यावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. जर काही नाराजी असती तर पक्षाध्यक्ष जेपी नड्डा हे मला का भेटले असते? असेही पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले. जेपी नड्डा यांच्याबरोबर झालेल्या भेटीत राज ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या भेटीची माहिती नड्डा यांना दिली असल्याचे सांगितले.