मुंबई : भारतीय क्रिकेटसंघामध्ये टी 20 वर्ल्ड कपनंतर मोठे बदल होण्याची शक्यता आहे. यूएईमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी 20 विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या विश्वचषकानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह दिग्गजांचे पत्ते कट होऊ शकतात. यामध्ये गोलंदाजी कोच भरत अरुण, फिल्डिंग कोच आर श्रीधर आणि फलंदाजी कोच विक्रम राठोड यांचा समावेश असू शकतो.
महत्त्वाचं म्हणजे स्वत: रवी शास्त्री यांनी आपण टी 20 वर्ल्डकपनंतर प्रशिक्षकपदी न राहण्याचा विचार करत असल्याचं BCCI च्या काही सदस्यांना कळवलं आहे. रवी शास्त्री यांचा कार्यकाळ याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे रवी शास्त्री यांच्यासोबत BCCI पुन्हा करार करण्याची शक्यता कमी आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, BCCI सुद्धा आता नव्या स्टाफच्या विचारात आहे. रवी शास्त्री यांनी यापूर्वी 2014 आणि 2016 च्या टी 20 विश्वचषकात टीम इंडियाचे संचालक म्हणून काम पाहिलं होतं. त्यानंतर अनिल कुंबळे हे भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. 2017 मध्ये अनिल कुंबळे यांच्यानंतर रवी शास्त्री यांच्याकडे पूर्णवेळ प्रशिक्षकपदाची धुरा देण्यात आली. 2017 पासून रवी शास्त्री भारतीय संघाचे कोच म्हणून काम पाहात आहेत.