नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंना देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले असून हा पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली. त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, “”खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्यासाठी माझ्याकडे देशभरातील अनेक नागरिकांनी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीसाठी धन्यवाद. त्यांच्या भावनांचा आदर करत आजपासून खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं असेल. भारताचे खेळाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आदर आणि अभिमान मिळवून देण्यामध्ये मेजर ध्यानचंद यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे खेलरत्न पुरस्काराला त्यांचे नाव देण्याचा निर्णय हा त्यांच्या कार्याचा उचित सन्मान असेल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.