नवी दिल्ली : भारतीय हॉकीत एक काळ असाही होता, जेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष भारतीय हॉकी संघावर असायचे . या काळात हॉकीचे जादूगार महान ध्यानचंद एकटेच विरोधी संघाच्या 11 खेळाडूंवर भारी पडत असत. भारताने 1928-1956 मध्ये सलग सहा वेळा ऑलिम्पिक हॉकीचे गोल्ड मेडल आपल्या नावे केले होते . या काळाला भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ म्हणून ओळखले जाते .
भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या हॉकी इव्हेंटमध्ये पहिल सुवर्णपदक 1928 मध्ये एम्सटर्डम ऑलिम्पिकमध्ये जिंकले होते . मेजर ध्यानचंद यांनी या संपूर्ण ऑलिम्पिकमध्ये एकट्याने सर्वाधिक 14 गोल डागले होते. तर भारतीय संघाने 5 सामन्यात एकूण 29 गोल डागले होते. या ऑलिम्पिकमध्ये अंतिम लढत भारत आणि नेदरलँड्समध्ये रंगली होती. मेजर ध्यानचंद यांच्या शानदार हॅक्ट्रिकच्या जोरावर टीम इंडियाने पहिले सुवर्णपदक जिकले होते . खास गोष्ट म्हणजे, भारताविरोधात संपूर्ण ऑलिम्पिकमध्ये कोणताही संघ एकही गोल डागू शकला नव्हता. त्यानंतर भारताने 1932 च्या लॉस एंजोलोस ऑलिम्पिक, 1936 ची बर्लिन ऑलिम्पिक, 1948 मध्ये झालेली लंडन ऑलिम्पिक, 1952 ची हेलसिंकी ऑलिम्पिक आणि 1956 ची मेलबर्न ऑलिम्पिक अशा सलग सहा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदके पटकावली होती.
भारताची पदके :
सुवर्ण पदक : 1928, 1932, 1936, 1948, 1952, 1956, 1964, 1980
रौप्य पदक : 1960
कांस्य पदक : 1968, 1972, 2020