कोल्हापूर : कोल्हापुरात पावसाने थैमान घातल्यानंतर या भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. २०१९मध्ये देखील कोल्हापुरात अशाच प्रकारे पूरस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली. यामध्ये पुलाच्या मोऱ्यांचा आकार, मोठ्या प्रमाणावर झालेले अतिक्रमण आणि अलमट्टी धरण अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.
अनेक भागांमध्ये एकाच दिवशी झालेल्या प्रचंड पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचे अजित पवार यावेळी म्हणले. “या वेळी कोल्हापुरात खूप पाऊस पडला. काही ठिकाणी एकाच दिवसात ३२ इंच पाऊस पडला. काही भागांमध्ये दोन दिवसांत ४९ इंच पाऊस पडला. अलमट्टी धरणाचा मुद्दा बऱ्याचदा येतो. वारणा, पंचगंगेचे पाणी आल्यामुळे फुगवटा वाढतो. राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्यामुळे तिथले दूध राज्याच्या इतर भागात पाठवता आले नाही. काल पाणी कमी झालं आणि आता वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.
कोल्हापुरात अनेक ठिकाणी कमी आकाराच्या मोऱ्या असल्याचा मुद्दा यावेळी अजित पवारांनी उपस्थित केला. “सध्याच्या मोऱ्या ब्रिटिशकालीन आहेत. त्याचा आकार कमी आहे. आता कमी वेळात जास्त पाऊस पडतो. बऱ्याचदा गाळ, दगड किंवा झाडे वाहून आल्यामुळे या मोऱ्या बंद होतात. त्यामुळे आता पाईप मोऱ्यांऐवजी बॉक्स किंवा स्लॅबच्या मोऱ्या बांधल्या जातील. पावसाळा संपला की बॉक्स किंवा स्लॅब प्रकारचे पूल बांधले जातील”, असे ते म्हणाले.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी नदीपात्रात अतिक्रमण झाले असून त्यावर कारवाई करणार असल्याचे अजित पवारांनी यावेळी जाहीर केले . “बरेच जण म्हणतात ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे संकट आले आहे. काही भागात आजही पाऊस नाही, पण काही भागांत खूप पाऊस पडला. काही ठिकाणी ४ दिवसांत ४०० मीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. काहींच्या मते अतिक्रमित बांधकामांमुळे हे झाले . त्यामुळे अतिक्रमण देखील हटवण्याचे पाऊल उचलले जाणार आहे. यात चालढकल करणाऱ्या किंवा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल”, असे त्यांनी सांगितले .