मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रभरात पावसानं हाहा:कार माजला असून चिपळूण आणि महाडमध्ये महापुराचं संकट ओढावलं असतानाच आता महाराष्ट्रावर दरडींनी घाला घातल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रत्नागिरी, रायगड आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळून 50 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात महाडच्या तळीये गाव, साताऱ्यातील आंबेघर गावात, तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडी आणि खेडच्या धामणंदमध्ये दरड कोसळून अनेक घरं गाडली गेली आहेत. 3 जिल्ह्यातील या दुर्दैवी घटनांमुळे महाराष्ट्रावर भीषण संकट ओढावल्याचं दिसून येत आहे.
महाडचं तळीये गाव उद्ध्वस्त, 36 मृतदेह हाती
महाड तालुक्यातील तळीये मधलीवाडी या गावातील जवळपास 35 घरांवर दरड कोसळून अनेक कुटुंब गाडली गेली आहे. काल दुपारी साडे चारच्या सुमारास ही या गावात दरड कोसळली. मात्र, संपूर्ण महाड शहर आणि सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी साचलं होतं. त्यामुळे मदतकार्यासाठी यंत्रणा पोहोचवणंही अवघड झालं. अखेर आज दुपारी 1 च्या सुमारास एनडीआरएफची टीम तळीये गावात पोहोचली. त्यावेळी नागरिकांनी 30 पेक्षा अधिक मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले होते. तर आतापर्यंत 36 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.