मुंबई : राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र राज्यात अनेक ठीकाणी आजही निर्बंध कायम आहेत. मुंबईतील लोकल कधी सुरू होणार, तसेच राज्यात अनलॉक कधी होणार, अशा अनेक मुद्द्यांवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे.
दिसालादायक म्हणजे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल करण्याची गरज असल्याचे राजेश टोपे म्हणाले. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, तिसरी लाट येऊ शकते पण ते कधी येईल, हे आपल्यावर आहे. जर आपण करोनाचे नियम व्यवस्थित पाळले तर आपल्याला करोनाची तिसरी लाट थोपवता येऊ शकेल. तसेच यावर लसीकरण सुद्धा रामबाण उपाय असल्याचे टोपे म्हणाले.महिना दोन महिन्यात राज्याचे लसीकरण १०० टक्के पुर्ण करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. पण त्या गतीने लस उपलब्ध व्हायला हवी. केंद्राने लसीकरणाला वेग देण्यासाठी मदत करायला हवी. जर ६० ते ७० टक्के लसीकरण झाले. तर सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल. ती या महामारीमध्ये गरजेची असल्याचे टोपे म्हणाले.