मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा उद्या, २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘राष्ट्रवादी जीवलग’ ही योजना सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून ही घोषणा केली.करोना काळात अनाथ झालेल्या राज्यातील ४५० मुलांसाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून ही योजना राबवली जाणार आहे.
या योजनेतून अनाथ मुलांना प्रेमाचा आधार दिला जाणार आहे. योजनेचा पहिला टप्पा एक वर्षाचा असून यासाठी पक्षातील ४५० सहकारी प्रत्येकी एका कुटुंबातील मुलांशी जोडले जाणार आहेत. अनाथ मुलींची जबाबदारी पक्षातील महिला, युवती तर मुलांची जबाबदारी युवक किंवा पुरुष कार्यकर्ता घेणार आहे, अस सुप्रिया सुळे यांनी सांगितले . ही योजना राबवण्यासाठी पक्षाने ‘राष्ट्रवादी दूत’ तयार केले आहेत. हे दूत ४५० अनाथ मुलांच्या घरात जातील. त्यांना काय गरज आहे, त्यांची अडचण समजून घेऊन ती माहिती पक्षाला देतील. शिवाय, प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडं उपलब्ध असलेली या अनाथ मुलांची माहिती जमा केली जाईल आणि यातून एक व्यापक कार्यक्रम हाती घेतला जाईल. संपूर्ण उपक्रमाची इत्यंभूत माहिती पक्षाच्या वेबसाइटवर व माझ्या फेसबुक पेजवर उपलब्ध असेल, असेही सुळे यांनी सांगितले .