येस न्युज मराठी नेटवर्क : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते आयसीएमआर आणि इतर केंद्रीय आरोग्य प्रशासनाकडून देखील सातत्याने देशवासीयांना संभाव्य रुग्णवाढीसंदर्भात सूचना दिल्या जात आहेत. लोकांकडून सातत्याने केलं जाणारं कोरोना नियमांचं उल्लंघन, मास्क वापरण्याकडे केलं जाणारं दुर्लक्ष आणि लोकांमध्ये आलेला निर्धास्तपणा या पार्श्वभूमीवर देशातील रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. गेल्या २ दिवसांपासून ४० हजारांच्या आत असलेली नव्या बाधितांची संख्या गेल्या २४ तासांत पुन्हा ४० हजारांच्या वर गेली आहे. देशभरात नव्या आकडेवारीनुसार ४१ हजार १५७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यासोबतच गेल्या २४ तासांत देशात तब्बल ५१८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
एकीकडे नवे कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमुळे चिंता वाढली असली, तरी करोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीमुळे आरोग्य प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. देशात गेल्यात २४ तासांमध्ये एकूण ४२ हजार ००४ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आजपर्यंत करोनातून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ३ कोटी २ लाख ६९ हजार ७९६ इतका झाला आहे.