चंद्रपूर : जिल्ह्यातील दारूविक्री उठविण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची राहिली आहे. त्यामुळे एका बार मालकाने राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे छायाचित्र बियर बार मध्ये लावून त्यांची आरती केली.
श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारू मुक्ती अभियानाच्या माध्यमातून अॅड. परोमिता गोस्वामी यांनी या जिल्ह्यात दारूबंदी आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची दखल घेत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घोषित केली होती. ६ वर्षे दारूबंदी असल्यामुळे दारू विक्रेते अडचणीत होते. दरम्यान त्यांना दिलासा मिळाला आहे. विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील दारूबंदी उठवली आहे.
जिल्ह्यात पुन्हा एकदा अच्छे दिन आले अशी भावना दारू विक्रेत्यांनी बोलून दाखवली आहे. मागील ३ दिवसात मद्यप्रेमींनी तब्बल १ कोटींची दारू रिचवल्याची माहिती आहे, याचाच आनंद म्हणून ग्रीन पार्क बारचे मालक गणेश गोरडवार यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या छायाचित्राची आरती केली. जो आमचे पोट भरतो तोच आमचा देव आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.