हद्दीच्या बाहेर लाचखोरी, पोलीस आयुक्तालयात खळबळ
सोलापूर, (प्रतिनिधी)ः- गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला मदत करतो म्हणून आरोपीकडून साडेसात लाखाची लाच घेताना सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह सहाय्यक पोलीस निरीक्षकाला रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवार दि. 9 जुलै रोजी झाली.
पोलीस निरीक्षक संपत नारायण पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे (रा. सोलापूर) असे दोघा लाचखोर पोलीस अधिकार्यांची नावे आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की, सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुरूम चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील आरोपींना मदत करून गुन्ह्यातून सही सलामत सुटण्यासाठी सहकार्य करण्यासाठी पोलीस निरीक्षक संपत पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे याच्या करवी 10 लाख रूपयाची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती साडेसात लाख रूपये देण्याचे ठरले. त्यावरून तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर तक्रारीची खातरजमा करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जुना पुना नाका छत्रपती संभाजी महाराज चौकात सापळा लावला असता सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे याने पैसे स्विकारत असताना त्याला रंगेहात पकडले त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत पवार यांच्या सांगण्यावरून त्यांच्यासाठी लाचेची रक्कम स्विकारली असल्याचे कबुल केले त्यावरून पोलीसांनी पोलीस निरीक्षक संपत पवार यांना शासकीय विश्रामगृहातून ताब्यात घेतले आणि त्या दोघां विरूध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस निरीक्षक संपत पवार हे सलगरवस्ती पोलीस ठाण्यात रूजू झाल्यापासून वादग्रस्त ठरलेले होते स्थानिक आमदारांशी भररस्त्यात वाद घालून तमाशा केला होता. त्यातच लॉकडाऊनमध्ये अनेक नागरीक तसेच व्यापार्यांना त्रास दिला होता त्याचबरोबर खाजगी सावकारांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडूनही सावकारी वसुल करण्यात मागे पुढे पाहात नव्हते. याबाबतच्या तक्रारी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे गेल्या होत्या परंतु त्यांनीही कानाडोळा केला होता त्यामुळे संपत पवार यांचे धारिष्ठ्य वाढलेले होते त्यातूनच लाच खोरीच्या गुन्ह्यात ते अडकले आहेत.
