टोकियो : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जपानची राजधानी टोकियोमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. टोकियोमध्ये होऊ घातलेल्या ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर जपानच्या पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी 12 जुलै ते 22 ऑगस्टदरम्यान टोकियोमध्ये कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळं आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं ऑलिम्पिक खेळांचा आनंद प्रत्यक्ष मैदानावर जाऊन लुटण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या काळात जगभरातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत. गेल्या वर्षी होणारी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने कोरोनामुळं पुढे ढकलली होती. आता ऑलिम्पिक स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत होणार आहे. पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी 12 जुलै ते 22 ऑगस्टदरम्यान आणीबाणी लागू केली आहे. काल बुधवारी तज्ञांसोबत त्यांची एक बैठक झाली. त्या बैठकीत सरकारी अधिकाऱ्यांनी सोमवारपासून 22 ऑगस्टपर्यंत टोकियोमध्ये आणीबाणी लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर अखेर आज आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ऑलिम्पिक खेळांचं आयोजन 23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान होत आहे. या ऑलिम्पिकसाठी विदेशी प्रेक्षकांना येण्यासाठी आधीच बंदी घातली होती. मात्र आता आणीबाणी लागू केल्यामुळं टोकियोमधील स्थानिक प्रेक्षकांना येण्यास देखील बंदी असणार आहे.