कोल्हापूर : आईचा खून करणाऱ्या मुलाला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. दारुसाठी पैसे न दिल्याने सुनील कुचकोरवी याने आईची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर आईचे अवयव भाजून खाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी नराधम मुलाला बेड्या ठोकल्या होत्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासातील ही पहिलीच फाशीची शिक्षा ठरली आहे.
कोल्हापूर शहरातील माकडवाला वसाहतीत 28 ऑगस्ट 2017 रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती. दारुसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरुन सुनीलने आई यल्लवा कुचकोरवी हिचा खून केला होता. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला.कवळा नाका येथील वसाहतीत सुनील कुचकोरवी राहत होता. 28 ऑगस्ट 2017 रोजी आईने दारुसाठी पैसे न दिल्यामुळे त्याचा वाद झाला. त्यानंतर आईची निर्घृण हत्या करुन त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्याच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला होता.
सुनीलला जन्मठेप द्यायची की फाशीची शिक्षा याबाबत दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाला होता. न्यायालयाने सुनीलने केलेले कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे असल्याचे सांगत फाशीची शिक्षा सुनावली. कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासातील ही पहिलीच फाशीची शिक्षा ठरली आहे.