सोलापूर : शिपिंग मध्ये ट्रेनिंग ऑफिसर म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . निरंजन देशमुख आणि अंकित सिंग दोघेही राहणार वाशी , नवी मुंबई अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सोलापूर येथील भवानी पेठेत राहणारा रोहन शिवाजी पवार या तरुणाने २०१८ व २०१९ मध्ये चेन्नई येथील इंटरनॅशनल मेरिटाइम अकादमीचा एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स केला होता. कोर्स पूर्ण झाल्यानंतर तो नोकरीच्या शोधत असताना नवी मुंबई येथे मर्चंट नेव्ही मध्ये डेक कॅडेट या पदासाठी जागा शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. डिसेंबर २०१९ पासून ते आजपर्यंत निरंजन देशमुख आणि अंकित सिंग या दोघांनी रोहन पवार यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले . रोहन पवार याने दोघांच्या खात्यावर साडेतीन लाख रुपये भरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्याचे फौजदार मतदार अधिक तपास करीत आहेत.