नवी दिल्ली: राज्यातल्या विरोधी पक्षाच्या नेत्याने केंद्रातल्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणं ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेटही त्याच स्वरुपाची आहे. त्याचा महाराष्ट्रातील आघाडी सरकार पाडण्याचा किंवा सरकार अस्थिर करण्याचा काहीच संबंध नाही, असं सांगतानाच आम्हाला सरकार पाडण्याशी काहीही घेणंदेणं नाही. आम्ही 2024च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असं भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. विरोधी पक्षनेत्याने केंद्रातील नेत्यांना भेटणं ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. देवेंद्र फडणवीसांचं दिल्लीतील नेत्यांच्या भेटी घेण्याशी सरकार पाडण्याचा काहीच संबंध नाही. पक्ष वाढीसाठी या भेटी असतात. सरकार पाडण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सरकार पाडण्याच्या नादात नाही. राज्यातील सत्ताधारीच सरकार पाडण्याच्या वावड्या उठवून संभ्रम निर्माण करत आहेत, असा दावा दानवे यांनी केला.