सोलापूर : आसरा ब्रिज जवळील कल्याणनगर भाग तीन येथे खेळताना मुलांमध्ये झालेल्या वाद-विवादानंतर मोठ्या व्यक्तींनी लोखंडी रॉड घेऊन मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. २३ मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. राम सुभाष चव्हाण, रेणुका सुभाष चव्हाण, राणी राम चव्हाण आणि रंजना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेखा भारत ढोबळे यांच्या मुलीची मुले राहत्या घरासमोर राम चव्हाण यांच्या मुलांबरोबर खेळत होती . त्यावेळी लहान मुलांमध्ये वाद झाला. सुरेखा ढोबळे यांनी आपल्या नातवंडांना घरी नेले . त्यानंतर राम चव्हाण यांच्यासह चौघेजण ढोबळे यांच्या घरी जाऊन आमच्या मुलांना का रागावलीस ? असा जाब विचारत लोखंडी रॉडने मारहाण केली. पोलिसात तक्रार दिली तर आमच्यासारखे वाईट कोणी नाही, अशी धमकी सुरेखा ढोबळे यांना देण्यात आली . सुरेखा ढोबळे यांच्या मुलीस देखील केस धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे फौजदार गायकवाड अधिक तपास करीत आहेत.