सोलापूर : शहरातील कोरोना रुग्णांचे प्रमाणे आणि मृत्यूंचे प्रमाण ग्रामीण भागाच्या तुलनेत कमी आहेत. ग्रामीण भागात टेस्टिंगच्या तुलनेत २० टक्के रुग्ण आढळत होते. आता याचे प्रमाण कमी झाले असून टेस्टिंगच्या तुलनेत १० टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. मात्र जिल्ह्यातील १३७ गावांत शंभरपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. या गावात कोरोनाचे संक्रमण तोडण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ही गावे हॉटस्पॉट ठरविली आहेत. या गावात टेस्टींग, अलगीकरण व उपचारास प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. त्यामुळे १ जूननंतर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला जाईल का याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.