येस न्युज मराठी नेटवर्क : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत सामाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्यांचे सवलतीच्या दरात जून मध्ये वाटप होणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चैन निर्बंध लागू करण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्यात येईल, अशी घोषणा केली होती.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करतानाच राज्य सरकारने अन्न धान्य मोफत वाटण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. मागच्या लॅाकडाऊनच्या काळात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत सामाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात आला होता. या योजनेअंतर्गत पुन्हा जुनमध्ये अन्नधान्य वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की राज्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत अन्नधान्यांचे राज्यात मोफत वितरण चालू आहे. त्याचबरोबर आता एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांनाही जुन महिन्यात प्रतिव्यक्ती 1 किलो गहू व 1 किलो तांदूळ याप्रमाणे 2 किलो अन्नधान्य सवलतीच्या दरात वाटप करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील 71 लाख 54 हजार 738 एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना लाभ होणार असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
छगन भुजबळ यांचं नरेंद्र मोदींना पत्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर राज्यातील गोरगरीबांना निर्बंध लागू झाल्यापासून एक महिना 3 किलो गहू, आणि 2 किलो तांदूळ देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेलं एक पत्र समोर आलं होतं. गेल्या वर्षी ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना’ महाराष्ट्रात यशस्वी ठरल्याचं भुजबळांनी आपल्या पत्रात म्हटलंय. तसंच महाराष्ट्रातील कोरोनाची गंभीर स्थिती लक्षात घेत मदतीचं पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली होती.