येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यात कोरोनाचं संकट घोंघावत असतानाच आता म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजारानेही डोकं वर काढलं आहे. राज्यात म्युकरकायकोसिसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. यात अनेक रुग्ण दगावत आहेत. अशावेळी राज्यातील 130 रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. या रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जाणार आहेत.
कोरोना साथरोगावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुमोटो याचिका दाखल आहे. त्याबाबत औरंगाबाद खंडपीठाने म्युकरमायकोसिसच्या उपचाराबाबत राज्य सरकारकडे विचारणा केली होती. त्याला उत्तर देताना राज्यातील 130 रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत अशा रुग्णांवर मोफत उपचार केले जात असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, यापूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्युकरमायकोसिस या आजाराचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश केला असल्याची माहिती दिली होती. तसंच या रुग्णांवरील उपचारासाठी आणि औषधांसाठी लागणारा सर्व खर्च या योजनेतून केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाबाबत घोषणा करतानाच टोपे यांनी अजून एक महत्वाची माहिती दिली आहे.
म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णाच्या कुटुंबाकडे कुठल्याही रंगाचे अर्थात पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड असेल त्या सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मदत दिली जाईल, असंही टोपे यांनी स्पष्ट केलंय.