दिल्ली : दिल्लीतील लॉकडाऊनमध्ये एक आठवड्यांची वाढ करण्यात आली असून सध्याचे निर्बंध आता ३१ मेपर्यंत कायम राहणार आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज याबाबतची घोषणा केली. कोरोना परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे दिल्लीत ३१ मे सकाळी ६ वाजेपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करत असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
दिल्लीमध्ये १९ एप्रिलपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. या लॉकडाऊनमध्ये आज पाचव्यांदा वाढ करण्यात आली. लॉकडाऊनदरम्यान मेट्रो सेवा देखील बंद राहणार आहे. याआधीचेच नियम कायम राहणार असल्याचं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे.
केजरीवाल यांनी यावेळी दिल्लीच्या नागरिकांचं मत जाणून घेतल्याचं सांगितलं. कोरोना परिस्थितीचा आढावा घेता राज्यात आणखी सात दिवसांचा लॉकडाऊन करावा अशी नागरिकांचीही मागणी होती, असं केजरीवाल म्हणाले. लॉकडाऊन उठवण्याची घाई केली तर गेल्या महिन्याभराच्या मेहनतीवर पाणी फेरलं जाईल. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे आणि अशीच परिस्थिती जर कायम राहिली तर ३१ मेनंतर निर्बंधांमध्ये सूट देण्याचा विचार सरकार नक्कीच करेल, असंही केजरीवालांनी सांगितलं. दिल्लीतील कोरोना रुग्णांच्या पॉझिटिव्हीटी रेट ३६ टक्क्यांवर होता तो आता २.५ टक्क्यांवर आला आहे.