येस न्युज मराठी नेटवर्क : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने येत्या रविवारी ११ एप्रिल रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नवी तारीख आयोगामार्फत लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा येत्या रविवारी होणार होती. ती तूर्त स्थगित करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात घेतलेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला आहे.
दरम्यान, राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यावेळी फोनवर राज यांनी MPSC ची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात चर्चा केली.