येस न्युज मराठी नेटवर्क : आजपासून भारतामध्ये क्रिकेटच्या रूपात इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) दुसरी लाट येणार आहे. कोरोनाच्या कहरामुळे गेल्या वर्षभरापासून मानसिक, आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या खच्चीकरण झालेल्या क्रिकेटप्रेमींचे पुढील दोन महिने पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी ‘आयपीएल’ सज्ज असून १४ व्या हंगामातील पहिल्या लढतीत गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत.
गतवर्षी करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एप्रिल-मे महिन्याऐवजी सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे १३व्या हंगामाचे आयोजन केले. या हंगामाला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद लाभल्यानंतर आता मात्र ही स्पर्धा पुन्हा मायदेशी परतली आहे. यंदाही करोनाचे सावट कायम असले, तरी सर्व नियमांचे पालन करून जैव-सुरक्षित वातावरणात प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये ‘आयपीएल’चा थरार रंगणार आहे.
चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर होणाऱ्या सलामीच्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली प्रथमच विजयी सलामी नोंदवण्यासाठी मुंबई उत्सुक आहे. तर दुसरीकडे चेपॉकवरील खराब कामगिरीला पुसून टाकण्याचे ध्येय विराट कोहलीच्या बेंगळूरुचे असेल. यंदा कोणत्याही संघाला आपल्याच मैदानावर सामने खेळण्याची संधी मिळणार नाही. त्याशिवाय नियमांचे पालन करतानाच आता कर्णधारांना ९० मिनिटांत २० षटके पूर्ण करण्याचे आव्हानही पेलावे लागणार असल्याने एकंदर ‘आयपीएल’च्या पहिल्या लढतीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
संघ
- मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डीकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, जसप्रीत बुमरा, ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्ने, राहुल चहर, ख्रिस लीन, जेम्स नीशाम, नॅथन कोल्टर-नाइल, पीयूष चावला, सौरभ तिवारी, अर्जुन तेंडुलकर, आदित्य तरे, धवल कुलकर्णी, जयंत यादव, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, मोहसिन खान, युधविर चरक, मार्को जान्सेन.
- रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, मोहम्मद अझरुद्दीन, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, फिन अॅलेन, कायले जेमिसन, डॅनिएल ख्रिस्तियन, केन रिचर्डसन, डॅनिएल सॅम्स, अॅडम झम्पा, यजुर्वेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, के. एस. भरत, सचिन बेबी, पवन देशपांडे, हर्षल पटेल, रजत पटिदार, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद.