सोलापूर । कोरोनातून बरे झाल्यानंतर कालच सीईओ स्वामी हे जिल्हा परिषदेमध्ये कोरोना नियोजनाच्या बैठकीसाठी जिल्हा परिषदेमध्ये आले होते. तत्पूर्वी सकाळपासूनच जिल्हा परिषदेच्या गेटवर अभ्यागतांची जिल्हा परिषद मुख्यालयात होणारी गर्दी विचारात घेता ती आटोक्यात आणण्यासाठी कोविड चाचणीसाठी तंबू लावून सोय करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांची कोविड चाचणी केल्याशिवाय जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. दुपारी तीनच्या सुमारास स्वामी हे बैठकीसाठी जिल्हा परिषदेमध्ये आले त्यावेळी निवडक विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी सीईओ स्वामी यांचे स्वागत केले.
जिल्ह्यामध्ये वाढणारे कोरोना रुग्ण व येऊ घातलेली कोरोनाची दुसरी लाट याचा प्रतिबंध करण्यासाठीचे नियोजन बाबत बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण जे एन शेख,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सोनिया बागडे, कृषी विकास अधिकारी बेंदगुडे, लेखाधिकारी कैलास कुंभार, साथरोग अधिकारी डॉ. इरफान सय्यद, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. विलास सरवदे, सहाय्यक प्रशासन अधिकारी बी एम स्वामी, कनिष्ठ प्रशासनाधिकारी रुपनर आदी उपस्थित होते.
यावेळी सीईओ स्वामी यांनी जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन टेस्टिंग ट्रेकिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर भर देण्याच्या सक्त सूचना दिल्या. जिल्ह्यातील ज्या तालुक्यांमध्ये सहवासीतांचा शोध, त्या प्रमाणात चाचण्या, बाधित दर जास्त असणे, मृत्युदर जास्त आहे अशा गट विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना कारणे दाखवा नोटिसा देण्याचे आदेश दिले.
यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी करमाळा, माढा आणि बार्शी यांना बाधीत दर वाढल्यामुळे व सहवासीतांचा शोध घेण्यात निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल तसेच मोहोळ व दक्षिण सोलापूर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना मृत्युदर जास्त असल्याबाबत व बोगस डॉक्टर यांचा शोध घेऊन कारवाई मध्ये कुचराई केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस देण्यात आली.
तसेच कोविड 19 रुग्णांच्या सहवासीतांचा प्रभावीपणे शोध घेण्याचे प्रमाण असमाधानकारक असल्याबाबत गट विकास अधिकारी पंढरपूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा, करमाळा, बार्शी व अक्कलकोट यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सदर नोटीस चा खुलासा नोटीस मिळाल्यापासून 24 तासात करण्याचे फर्मान सीईओ स्वामी यांनी सोडले. कोविड नियोजनात काही अडचणी असतील तर मोकळेपणाने माझ्याशी चर्चा करा त्या अडचणी सोडवण्याचा माझ्याकडून प्रयत्न असेल परंतु दिलेल्या आदेशाप्रमाणे काम होणार नसेल व कामात दिरंगाई व कुचराई होणार असेल तर ते कदापि माफ केले जाणार नाही मला कारवाई करण्यास भाग पाडू नका अशा कडक शब्दात सीईओ स्वामी यांनी कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात राग व्यक्त केला.