येस न्युज मराठी नेटवर्क : पुरोगामी चळवळीचे अग्रणी योध्दा, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे निष्ठावान प्रचारक, सत्य शोधक समाजाचे प्रखर कार्यकर्ता, लेखक, विचारवंत कॉग्रेसचे माजी आमदार अॅड. एकनाथराव साळवे यांचे आज शनिवार १३ मार्च रोजी दुपारी १.२० वाजता निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते.
मूळचे बामणी येथील रहिवासी असलेले साळवे मागील अनेक वर्षापासून सिव्हील लाईन प्रभागात मुलगा अॅड. जयंत साळवे व कुटूंबियांसोबत वास्तव्याला होते. वृध्दापकाळाने त्यांची आज दुपारी प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी शालिनी, एक मुलगा, ३ मुली, सून, नातू, जावई व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांचे पार्थिवावर रविवार १४ मार्च रोजी बामणी येथे सकाळी ११ वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
३० मार्च १९३० रोजी एका गरीब शेतकरी कुटूंबात एकनाथराव यांचा जन्म झाला. बालपणापासून शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण चंद्रपुरात घेतले. त्यानंतर नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ची पदवी घेतली. शिक्षक म्हणून नोकरी करतांनाच एल.एल.बी. केले. त्याच काळात त्यांची नागपुरात कम्युनिस्ट नेते ए.बी. बर्धन यांच्याशी मैत्री झाली. परंतु नागपुरमध्ये न राहता चंद्रपुरात येऊन त्यांनी वकीली व्यवसाय सुरू केला. १९६७ मध्ये काँग्रेस पक्षाने एकनाथराव यांना चंद्रपूर विधानसभा मतदार संघातून पक्षाची उमेदवारी दिली. तेव्हा ते प्रचंड मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर ते पुन्हा १९७२ मध्ये आमदार म्हणून विजयी झाले. मात्र १९७८ मध्ये त्यांचा पराभव झाला.