कोल्हापूर : “महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही म्हणणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर अविश्वास ठराव आणावा, त्यानंतर त्यांना समजेल की तिघांची आघाडी किती भक्कम आहे” असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. चंद्रकांत पाटील यांना महाविकास आघाडीत बेबनाव असल्याचं विधान दोन दिवसांपूर्वी केलं होतं, त्याला मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं.
माजी मंत्री अनिल गोटे यांनी पोलिसांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचाही हसन मुश्रीफ यांनी समाचार घेतला. याबाबत गृहमंत्र्यांनी योग्य ती कारवाई करावी, असं मुश्रीफ म्हणाले. आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीविषयी विचारलं असता महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक एकत्र लढवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं हसन मुश्रीफ म्हणाले. त्यामुळे गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात नवीन राजकीय समीकरणं जुळण्याचे संकेत दिले.