लखनऊ : भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज मिताली राजने शुक्रवारी इतिहास घडवला. ३८ वर्षीय मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली तर जगातील फक्त दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. मितालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या वनडेत हा विक्रम केला.आफ्रिकेविरुद्ध लखनऊ येथे झालेल्या सामन्यात मितालीने ३५ धावा करताच १० हजार धावांचा टप्पा पार केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वप्रथम १० हजार धावाचा विक्रम इंग्लंडच्या चार्लेट एडवर्ड्सने केला होता. चार्लेटला मागे टाकण्यासाठी आता मितालीला २९९ धावांची गरज आहे.
