येस न्युज मराठी नेटवर्क : टेंभुर्णी भागात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी घातलेल्या छाप्यात शेतामधील खड्ड्यात लपवण्यात आलेली 16 हजार लिटरची लोखंडी टाकी , 50 लिटर डिझेल तसेच पांढऱ्या रंगाची बारा हजार लिटरची लोखंडी टाकी , महिंद्रा अर्जुन कंपनीचा ट्रॅक्टर ,केशरी रंगाची टँकर टाकी तसेच डिझेल मोजण्यासाठी मीटर पाईप , मोटार असलेली ट्रॉली सहा प्लास्टिक व लोखंडी पाइप लावलेली टील्लू मोटार अशा वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
या ठिकाणी डिझेल प्रति लिटर अकरा रुपये कमी दराने विकण्यात येत होते. गुन्हे शाखेला याबाबत माहिती मिळाल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली. सात लाख नऊ हजार पाचशे रुपये रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायदा 155 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पेट्रोल डिझेलचे भाव वाढत असताना बेकायदेशीरपणे डिझेलचा साठा करून स्वस्त दरात डिझेल विकण्याचा गोरखधंदा बरेच दिवस चालू असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. शेतामध्ये अचानक अनेक ट्रक जात असताना दिसल्यामुळे पोलिसांनी मागोवा घेत ही कारवाई केल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले . माढा तहसील कार्यालयाचे पुरवठा अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी देखील या धाडीमध्ये पोलिसांना सहकार्य केल्याचे सांगण्यात आले.