येस न्युज मराठी नेटवर्क : फेब्रुवारी 2021 मध्ये शेवटच्या आठवड्यात ज्या वेगाने कोरोनाच्या संसर्गाचा आकडा वाढत आहे, त्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. एक कोरोनाबाधित रुग्ण बरा होण्याकरिता सर्वसाधारण 14 दिवस लागतात. गेली तीन दिवस राज्यात रोज नव्याने 8 हजारापेक्षा अधिक नवीन रुग्णांची नोंद होत आहे, जर ही वाढ अशीच होत राहिली तर भविष्यात अधिक धोके संभवतात. त्यामुळे या आजाराला न घाबरता, सतर्क राहून सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे काम आता नागरिकांना करावे लागणार आहे. राज्याची आरोग्य यंत्रणा रात्रं-दिवस काम करत कोरोना बाधित रुग्णांना उपचार देत असून रोज हजारो रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. मात्र, त्याचवेळी रोज बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा अधिक प्रमाणात लक्षणीय स्वरूपात नवीन रुग्णांचे निदान होत आहे. हा प्रकार असाच चालू राहिला तर या आजाराला पायबंद घालण्यासाठी अजून किती काळ लागणार आहे हे सांगणे सध्या तरी कठीण आहे.
जोपर्यंत नवीन रुग्णाच्या संख्येवर आळा घालण्यात यश मिळत नाही तोपर्यंत ही लढाई निरंतर चालूच राहील सध्या अशी परिस्थिती आहे.
शासनाच्या आकडेवारीनुसार—
20 फेब्रुवारीला नवीन रुग्ण 6281, बरे झालेले रुग्ण 2867
21 फेब्रुवारीला नवीन रुग्ण 6971, बरे झालेले रुग्ण 2417
22 फेब्रुवारीला नवीन रुग्ण 5210, बरे झालेले रुग्ण 5035
23 फेब्रुवारीला नवीन रुग्ण 6218, बरे झालेले रुग्ण 5869
24 फेब्रुवारीला नवीन रुग्ण 8807, बरे झालेले रुग्ण 2772
25 फेब्रुवारीला नवीन रुग्ण 8702, बरे झालेले रुग्ण 3744
26 फेब्रुवारी नवीन रुग्ण 8333 बरे झालेले रुग्ण 4936